कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील श्री अंबाबाई मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असून यास दक्षिण काशी असेही संबोधले जाते. श्री अंबाबाई मंदिराचा पुराणातही उल्लेख आढळतो.
श्री अंबाबाई मंदिर पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत.
देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.
कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. श्री अंबाबाई मंदिर हे शहरातील मध्यवर्ती भागात असून मध्यवर्ती बसस्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी जायला रिक्षा उपलब्ध आहेत.
रंकाळा तलाव
रंकाळा तलाव हे कोल्हापुरातील पर्यटकांचे आवडते प्रेक्षणीय स्थळ आहे. महालक्ष्मी मंदिरानंतर रंकाळा तलाव कोल्हापूर शहरात दुसर्यात क्रमांकाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. रंकाळा तलाव हे रंकाळा चौपाटी म्हणून देखील ओळखले जाते. रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या २ किमी अंतरावर आहे.
रंकाळा तलावाचे विकासकाम राजा शाहु महाराज यांनी केले. रंकाळा तलाव पसरलेला असून त्याची मध्यभागी खोली सुमारे ३५ फूट आहे. रंकाळा तलावाचे अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तलावाभोवती नारळाची झाडे आहेत, जी तलावाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. तलाभोवती चौपाटीसारखी सुंदर तटबंदी करण्यात आली.
येथे बसून पर्यटक निसर्गसौंदर्याचा आंनद लुटतात. बोटींग तसेच तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या खाद्यपदार्थांच्या विविध स्टॉल्समुळे येथे फिरताना पर्यटकांना चौपाटीवर फेरफटका मारल्याचा फिल येतो. या ठिकाणी जायला रिक्षा उपलब्ध आहेत.
न्यू पॅलेस म्युजियम, कोल्हापूर
न्यु पॅलेस भवानी मंडप – कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन ईमारत आहे. 1877 – 1884 ह्या कालावधीत ही ईमारत बांधली गेली. काळ्या, सपाट केलेल्या दगडांचा एक ऊत्कृष्ट नमुना बांधला आहे. या इमारतीला लागुनच एक बाग आहे. त्याला दगडांच्या भींतीचे व तारांचे कुंपन आहे.
1877 मध्ये येथे घड्याळ बसवले. थोड्या – थोड्या अंतरावर येथे बुरूज आहेत. प्रत्त्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी लिहीले आहे. येथे प्राणी संग्रहालय व मैदानाची जमीन आहे. आजचे, श्रीमंत शाहु महाराजांचे निवास्थान आहे. न्यु पॅलेसच्या आतील बाजुस छत्रपती शाहु महाराजांच्या वस्तु संग्रालयासाठी जागा केली आहे, ज्याच्यावरून कोल्हापूर राज्यकर्त्यांची आठवण होते. न्यू पॅलेस हे शहरातील कसबा बावडा रस्त्यावर बसस्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी जायला रिक्षा उपलब्ध आहेत.
ज्योतिबा मंदिर
ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.
हे मंदिर डोंगरावर असून या डोंगराला ज्योतिबा डोंगर नावाने ओळखले जाते. हे मंदिर कोल्हापूर शहरापासून १४ किमी अंतरावर आहे. ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी देखील म्हणतात.
ज्योतिबा मंदिर ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. हे मंदिर डोंगरावर असून या डोंगराला ज्योतिबा डोंगर नावाने ओळखले जाते. हे मंदिर कोल्हापूर शहरापासून १४ किमी अंतरावर आहे. ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी देखील म्हणतात. ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते.रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. महाराष्ट्र राज्य व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे येतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासनकाठ्या असतात. ज्योतिबा डोंगर हे कोल्हापूर शहरापासून १४ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी जायला रिक्षा, सार्वजनिक बस, खाजगी टॅक्सी उपलब्ध आहेत.
श्री नृसिंहवाडी मंदिर
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं.
नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. नृसिंहवाडी हे तीर्थस्थळ कृष्णा-पंचगंगा नदीच्या तीरावर वसले आहे.
हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी जायला बस, टॅक्सी, रिक्षा, इ. सुविधा उपलब्ध आहेत.
श्री बाळूमामा मंदिर
संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात.श्री संत बाळूमामा यांची समाधी आद्मापूर येथे आहे. रविवार, अमावस्या, पौर्णिमेस येथे नागरिकांची गर्दी होत असते.
हे ठिकाण कोल्हापूर शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी जायला बस, टॅक्सी, रिक्षा, इ. सुविधा उपलब्ध आहेत.
श्री कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून महादेव व भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या मंदिराला भारत सरकारकडून राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कोपेश्वर मंदिरात एकूण १०८ खांब असून इथला स्वर्ग मंडप ४८ खांबांवर उभा आहे.
हे ठिकाणी कोल्हापूर शहरापासून ६० किमी अंतरावर असून या ठिकाणी जायला बस, टॅक्सी, रिक्षा, इ. सुविधा उपलब्ध आहेत.
पन्हाळा किल्ला
पन्हाळा किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला आहे. ११ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला होता. सन १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. याच किल्ल्याच्या पायथ्याशी पावनखिंड आहे. जिथे वीर बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या सैन्याने छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांच्या वेढ्यातून बाहेर काढले होते.
पन्हाळा किल्ला हे कोल्हापूर शहरापासून २५ किमी अंतरावर असून ठिकाणी जायला बस, टॅक्सी, रिक्षा, इ. सुविधा उपलब्ध आहेत.
दाजीपूर अभयारण्य
दाजीपूर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यातील एक संरक्षित क्षेत्र असून हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले आहे.
या अरण्यात मुख्यतः गवा हा प्राणी आढळतो. या व्यतिरिक्त या अभयारण्यात हरिण, सांबर, चितळ, इ. प्राणीही आढळतात. नागरिकांना वन्यजीव पाहण्यासाठी अभयारण्यात सफारीचीसुविधा उपलब्ध आहे. या अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मे दरम्यान असतो, जेव्हा हवामान आल्हाददायक असते आणि वन्यजीव सक्रिय असतात. या अभयारण्यात रात्रभर मुक्काम करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाची सोयही आहे.
दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर शहरापासून ६० किमी अंतरावर असून ठिकाणी जायला बस, टॅक्सी, इ. सुविधा उपलब्ध आहेत.