कोल्हापूर महानगरपालिका ही शहराची प्रातिनिधिक संस्था आहे. कोल्हापूर महानगरपालिका ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक प्रश्नांशी निगडित असणारी संस्था असून त्यांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. मूलभूत अशा स्वच्छता, पाणी, रस्ते, अग्निशमन, आरोग्य व रुग्णालय या सेवा देण्याबरोबरच प्रशस्त अशी मैदाने, वाचनालय, सार्वजनिक बागा यासारख्या सुविधाही महानगरपालिका उपलब्ध करुन देते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचाव्यात, त्यांचा सहभाग मिळावा, यासाठी महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेने अद्ययावत संकेतस्थळ सुरु केले आहे.
आपण सर्व जाणताच की, हे जग झपाट्याने प्रगती करीत आहे. जगाच्या कानाकोप-याशी संगणकाच्या माध्यमाने आपण थेट संपर्क साधू शकतो. राजर्षि शाहू महाराजांच्या या करवीर नगरीने कला, क्रिडा, शिक्षण, विज्ञान, उद्योग, व्यापार, संशोधन, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रात सर्वांगाने विकास केला आहे. अशा विविध नोंदीचे एकत्रिकरण म्हणजे हे संकेतस्थळ आहे. शहराची विविध ऎतिहासिक माहिती तसेच महानगरपालिकेतील विविध प्रकारची माहिती, तसेच महत्वाच्या घटना, इ. माहिती एकत्रितपणे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचा हा एक प्रयत्न आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा आजवरच्या प्रगतीचा धावता आढावा या संकेतस्थळावर घेऊ शकाल. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांची तसेच विविध योजनांची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोल्हापूर महानगरपालिका नागरिकांचे स्वास्थ्य, सेवा व सुरक्षेसाठी सतत कार्यरत असते. त्याच्या मोबदल्यात नागरिक विविध कर भरत असतात. या विविध करांची माहिती, ते आकारण्याची पध्दत, त्यासाठी आवश्यक असणारे अर्ज, ते भरण्याची माहिती व पद्धत अत्यंत सोप्या पध्दतीने व सर्वसामान्य नागरिकांसाठी आकलन होईल, अशा स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत आली आहे. नागरिकांचा जाहिरनामा, शहराची माहिती, वार्षिक बजेट, तसेच इतर महत्वाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित विविध सेवा सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देणेत आल्या आहेत. विविध सेवांचे अर्ज करणेपासून त्या अर्जावर निर्णय होईपर्यंत, प्रत्येक टप्पा ऑनलाईन करणेत आला आहे. तसेच विविध सेवांचे अलर्ट मॅसेज देखील नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना त्यांचे अर्जाची सध्यस्थितीची माहितीदेखील वेळोवेळी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिक घरबसल्या सदर सेवांचा लाभ घेऊ शकतात. तसेच महानगरपालिकेच्या सदर संकेतस्थळाचा वापर करुन नागरिक विविध प्रकारचे कर अथवा शुल्क अदा करु शकतात. यामुळे नागरिकांच्या बहुमूल्य वेळेची बचत होऊन नागरिकांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास देखील कमी होईल.
कोल्हापूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ हे मराठी व इंग्रजी भाषेत तयार करणेत आले आहे. मी कोल्हापूरच्या नागरिकांना दिल्या जाणा-या सेवांचा दर्जा वाढविणेसाठी माझ्या पातळीवर सर्वोत्तम प्रयत्न करेन. मी ई-गव्हर्नन्स प्रणालीद्वारे अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी प्रयत्न करेन. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त या नात्याने मी कोल्हापूरच्या नागरिकांना खात्री देते कि, नागरिकांना देणेत येणा-या सेवांमध्ये सुधारणा करण्याचे ध्येय साध्य करणेसाठीचा एक पाऊल म्हणून सदर संकेतस्थळ उपयुक्त ठरेल यासाठी मी प्रयत्नशील राहिन.
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!